ईश्वरानेच काय चूक केली असावी
हे सांगण्याची समज आपल्यात नव्हती
हा गवंडी भिंत बांधताना
छताबददल काय विचार करतो
आपल्याला माहीत नाही
हा सुतार लाकडं कापताना काही चूक करतो का
आपल्याला कळूं श क त नाही
या प्लंबरने उभ्या केलेल्या पाइप मधून
पाणी वर जातय की खाली येतय
आपण सांगू शकत नाही
या शॉवर खाली असंख्य वेळा स्नान करूनही
हा इलेक्ट्रीशीअन कुठली दोन टोकं एकमेकांना जोडतो
आणि क्षणार्धात कसं उजळूंन निघतं आपलं घर प्रकाशात
आपल्याला माहीत नाही
हा कुठल्या समुद्रसपाटीचा अंदाज असतो ह्या फरशीवाल्याला
यावर सांडलेलं पाणी एक इंचं हालत नाही इकडे तिकडे
नुसत्या नजरेतून सोनाराला जसं कळतं
आणि जाहीर होतं पितळ
तसं कुठल्याही धातूचं अगाध ज्ञान आपल्या जवळ नाही
या लोहाराच्या भट्टीत पोलाद कसं ऊतू जातं
साय धरतं दुधासारखी
ती ठीणग्यातली जादू पाहुन अवाक झालो आपणही
हा चित्रकार कुठल्या आभाळातून रंग आणतो शोधून
आपल्याला अंदाजच नाही
हा गाणं म्हणताना काय सांगू पाहत असतो
सुरांमधून शब्दांशिवायचं
आपण ऐकून घेतलं पण समज लं नाही कधीही
आणि एखादा कवी कशी भाषा वाकवतो धनुष्यासारखी
आपल्याला कळूं शकलं नाही
इतकं घायाळ होउनही
एखादा वैज्ञानिक संगणकावर
कशी साठवून ठेवतो सातासमुद्रापलीकडची चित्रं
आपण पाहत राहिलो नुसतेच
ईश्वरानेच काय चूक केली असावी
हे सांगण्याची समज अजूनही नाहीये
पण ही सगळी माणसं पाहुन
ईश्वराने काहीही चूक केलीली नाहीये
असं पुन्हा पुन्हा सांगावसं वाटलं आपल्याला
आणि हा कोण शिंपी माझा इतका जिवलग झाला
लाख चूका करूनही
मी ईश्वराला सलाम केला कधी नव्हे ते
त्याने एक कफ़न शिवलं
आणि हा मृत्यु माघारी फिरला
हे नातं पुन्हा एका जीवघेण्या वळणा वर येवून
ऊभं राहिलं श्वास घेत ..........
................................................... अभय दाणी
व्वा.......काय अप्रतिम लिहिलाय तुम्ही खूप जबरदस्त....भाषा....आशय ....अतिशय एकरूप जाणवत राहतो....
ReplyDelete