Wednesday, July 27, 2011

संसाराचा डगमगता कंदील

चार गाडगी मडकी
उचलून नेली रात्रीतून म्हणून
तू विणलेलं कोळ्याच जाळं
नाहीसं होत नाही
हरवत नाहीत अंधुक रस्त्यांवरच्या दिव्याखाली
तासंतास वाचलेल्या
सारा शागुफ्ताच्या काळीज हेलावून टाकणाऱ्या
शब्दांच्या सावल्या
रोशनगेटच्या रस्त्यावर
आपल्या पिशवीतून सांडलेल्या
फळांचा वास
रानात सोडून आलेल्या मांजरासारखा
परत येतो
संसाराचा डगमगता कंदील
शहरातून निघून जातो मजबूरीने
पण मोहल्ल्यातले प्रकाशाचे डाग
निघता निघत नाहीत
नुसता योगायोग नसतो
की दारात गोडलिंबाच झाड बहरतं
मी तुझ्या हातात
मैत्रीनं भारलेल
लिंबा चं गाठोडं देतो
तर एका कवितेतलं दृश्य
जिवंत होवून थरथर तं
आता जंगलाची वाट धरलीच आहेस
तर रानपाखरासारखं घरट बांध
किती दिवसात
तुझ्या हलत्या झाडावर
फडफडली नाही कविता
तुझ्या अंगणात मला चिव चिव ऐकायचीय ....
.......................................................................श्रीधर नांदेडकर