Thursday, September 13, 2012

नदीकाठी भटकणारी माणसं

नदीकाठी भटकणारी माणसं
नेहमी एका हलत्या घरातून
मावळतीचं आकाश पाहतात
निळाईवर उगवलेला शोधून ठेवतात
खुणेचा तारा एकुलता
आणि जातील तिथे
अंगणात निनावी दाणापाणी ठेवता

नदीकाठी भटकणार्‍य़ा माणसांना
नेहमी उपलब्ध नसतात
पैलतीरावर नेणारे पूल
ते डोळ्यातल्या डोळ्यात
सुकवू पाहतात ऐलतीराची कासावीस

नदीकाठी भटकलेल्या माणसांना
अस्थी निर्माल्य आणि पानदिव्यांचे
हेलकावे आठवतात
मृत्य़ू श्रद्धा आणि फ़डफ़डत्या जीवनयात्रेचं
प्रतीक म्हणून

नदी सुकून जाते
तेव्हा माणसं तडफ़डून
आपल्या रक्तवाहिन्या चाचपतात
वाळू उकरतात
आणि झोपेत आई आई म्हणून ओरडतात

नदीकाठी भटकणारी माणसं
रस्ता भरकटतात भाकरीसाठी कधीतरी
त्यांना माहीत नसतात भयभीत सशांसारखेच
रस्ते ओलांडण्याचे नियम
ते उड्डाणपुलाखाली वाकून वाकून पाहतात
नदीशी आपल्याच भावंडांनी
केलेल्या विश्वासघाताचं काळंकभिन्न पाणी

घास तर अडतोच घशात अशावेळी
लेकीच्या संसाराचं वाटोळं झालेलं पाहून
परत फ़िरणार्‍या बापासारखे
जंगलाच्या दिशेनं चालू लागतात
नदीकाठी भटकणारी उदास माणसं
                            श्रीधर नांदेडकर


3 comments:

  1. प्रिय श्रीधर, मी तुझ्या कविता आवर्जून वाचतो. त्या प्रस्थापित चालीच्या नाहीयत. म्हणून आवडतात. वरील कविता उत्तम आहे. फक्त शेवटची दोन कडवी नसतील तर अधिक उत्तम आहे."आणि झोपेत आई आई म्हणून ओरडतात" इथे संपावी कविता. क्षमस्व.

    रवी लाखे

    ReplyDelete
  2. छान कविता आहे एकदम....ज्यांनी काह्रोखा नदी अनुभवलीय अश्याना खरोखर तिच्या विषयीची ही आंतरिक लय भावून जाते मनोमन........................

    ReplyDelete
  3. नांदेडकर सरांच्या कविता प्रतिमांच्या नव्या प्रदेशात माणुसकी,नैतिकता,मूल्य यांचा अनुभव देतात ,
    त्यांची कविता संपत नाही .मनात अर्थांचे अनेक वलये निर्माण करते ..मराठी भाषेला हृदयापर्यंत पहोचविते.

    ReplyDelete