Wednesday, August 24, 2011

सगळ्यांत खतरनाक


कष्टाची लूट सगळ्यात खतरनाक असत नाही
पोलिसाचा मार सगळ्यात खतरनाक असत नाही
बेईमानी-लोभी मूठ सगळ्यात खतरनाक असत नाही

घरबसल्या पकडलं जाणं-वाईट तर आहेच
भयभीत स्तब्धतेत जखडलं जाणं-वाईट तर आहेच
पण सगळ्यात खतरनाक असत नाही

कपट कारस्थानाच्या गोंधळात
बरोबर असून ही दबून जाणं-वाईट तर आहेच
एखाद्या काजव्याच्या प्रकाशात वाचणं
मुठी आवळून फ़क्त वेळ काढत बसणं वाईट तर आहेच
पण सगळ्यात खतरनाक असत नाही

सगळ्यात खतरनाक असतं
मुर्दाड शांततेन भारलं जाणं
तडफ़ड नसणं, सगळं सहन करत जाणं
घरातून सरळ कामावर जाणं
कामावरून सरळ घरी येणं
सगळ्यात खतरनाक असतं आपल्या स्वप्नांचं मरणं.

सगळ्यात खतरनाक ते घड्याळ असतं
जे तुमच्या मनगटावर चालू असल तरी
तुमच्य़ा नजरेत थांबलेलं असतं

सगळ्यात खतरनाक तो डोळा असतो
जो सगळं बघत असूनही बर्फ़ाचा गोळा असतो
ज्याची नजर विसरुन जाते जगाचं प्रेमानं चुंबन घेणं
जो वस्तू पासून वर येणा़ऱ्या आंधळेपणाच्य़ा वाफ़ेवर कलंडतॊ
जो दैनंदिन क्रम पिऊन टाकून
एका निरुद्देश उजळणीच्या उलथापालथीत हरवून जातो
सगळ्यात खतरनाक तो चंद्र असतो
जो प्रत्येक हत्याकांडानंतर
सुनसान अंगणाच्य़ा माथ्यावर येतो
पण तुमच्य़ा डोळ्यात झॊंबत नाही मिरचीसारखा

सगळ्यात खतरनाक ते गीत असतं
ज्याला तुमच्या कानापर्यंत पोहोंचण्यासाठी
विलापिका व्हाव लागतं
आतंकित लोकांच्या दारावर
जे गुंडासारखं ऎटीत उभं असतं
सगळ्यात खतरनाक ती दिशा असते
जिच्यात आत्म्याचा सूर्य बुडून जातो
आणि त्याच्या मुर्दाड उन्हाचा एखादा तुकडा
तुमच्या देहाच्या पूर्वेला टोचत राहतो

कष्टाची लूट सगळ्यात खतरनाक असत नाही
पोलिसाचा मार सगळ्यात खतरनाक असत नाही
बेईमानी-लोभी मूठ सगळ्यात खतरनाक असत नाही !

पाश
पंजाबी कवी
अनुवाद :डॉ. चन्द्रकांत पाटील

1 comment:

  1. pash chi kvita mnala ekadam bhidli..chandrkant patil yani sudha atishay samrpak anuwad kelyasarkha janvte..aapan ya blog dvara suru kelela upkram khup aawadla..aapnas pudil watchalis sdichcha..

    ReplyDelete