Friday, September 2, 2011

( जिथं आजही एस.टी. जात नाही
अशा जळगाव-मेटे या खेड्यात राहून माध्यमिक शाळेपर्यंत
काही कोसांचं अंतर पायी चालत बोरगाव येथे शिकायला जाणारं
एक मित्रांचं स्वप्नाळू टोळकं होतं...हलाखीचे दिवस होते..अन..
आयुष्याबद्दल काही तक्रार नव्हती...कुठ्ल्यातरी संध्याकाळी
रवी कोरडे नावाच्या पोराला
सर्जनाचा दंश झाला..आणि अस्सल अनुभवाची कविता आकार घेऊ लागली.
करीअरीस्ट कळ्पाकडेआणिप्रसिध्दीकडे पाठ फ़िरवलेल्या या कवीच्या कविता या ब्लॉगवर
तुम्ही आता नियमित वाचू शकाल )


तू बांधावरचं एक कंगाल झाड


तू बांधावरचं एक कंगाल झाड
ज्याच्या फ़ांद्या तोडल्या गेल्या
सरपण म्हणून
लेकीच्या लग्नासाठी

धसकटांशी खेळून खेळून
तू दमलेला
अन्
देह झालेला काळा ठिक्कुर
चंद्र न उगवलेल्या रातीसारखा

मस्तक शांत रहावं म्हणून
तू लावतोस टिळा
अन् मुद्रा एवढ्या अंगभर
की तू मला
विटेवर उभा असल्याचा
भास होतो

एका हाकेच्या अंतरावर
दिसतो तुला
काळ्याभोर पाण्याचा डोह
जो तुझ्या मर्दानी बाहूंनीही
तू नाही उतरवू शकत
वावराच्या पोटात

वाहून जाते बरेच काही
तुझ्या डोळ्यादेखत
तेव्हा तुला
आडवे व्हावेसे वाटते
अन्
बांध करावा वाटतो देहाचा

साचलेला गाळ तुडवून
तू शोधतोस
नुकतीच वयात आलेली कणसं
जी उचलणार होती
तुझा श्वास
नसानसात
की ज्यामुळे
तुला जातानाही
हसू फ़ुटलं असतं

....................... रवी कोरडे